मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे भल्या सकाळी नेहमी पत्रकार परिषद घेत किंवा ट्विट करत विरोधकांवर टीका करत. अलिकडच्या काळात राऊत कधी तरीच पत्रकार परिषद घेत आहेत. त्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे.
सकाळी ९ वाजता बोलणारे अलीकडे कमी बोलू लागले आहेत, कारण काही माहिती नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावर कार्यकर्त्यांकडून ‘पवारांचा पोपट’, ‘विचार संपले’, ‘पेट्रोल संपलं अशी शेरेबाजी करण्यात आली. त्यावर फडणवीस म्हणाले की, “तुम्ही त्यांना कृपया शिव्या देऊ नका, उलट आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जितका वाटा आहे, तितका इतर कोणाचाच नाही. महाराष्ट्राच्या जनतेला, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी वैताग आणला. त्यामुळे हा लाऊडस्पीकर बंद करायचा असेल तर सत्तापरिवर्तनाशिवाय पर्याय नाही असा निर्णय त्यांनी घेतला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोपाच्या भाषणात फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली आहे.
नव्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील. तसेच कार्यकर्त्यांनी पदांची अपेक्षा ठेवू नका असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.