मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना होत आला तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला लागणाऱ्या विलंबावरुन विरोधकांनी सडकून टीका केली. पुढच्या आठवड्यात हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदासाठी इच्छुकांना सल्ला दिला आहे.
कमीत कमी अपेक्षा ठेवा, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. ‘मंत्रिपदासाठी अत्तापर्यंत अनेक नेत्यांनी मला अर्ज दिला आहे. जवळजवळ १२०० अर्ज माझ्याकडे आले आहेत. मात्र, सर्व नियमांचे पालन करुनच मंत्रिमंडळ विस्तारात आमदारांना संधी दिली जाईल. यासाठी राज्यपालांचेही मार्गदर्शन घेण्यात येईल’, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे केवळ भाजपचे सरकार नाही तर शिवसेना-भाजपचे युती सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काही जागा शिवसेनेला द्याव्या लागतील. अनेकजण अनुभवी आहेत पण सगळ्यांनाच संधी मिळू शकणार नाही. त्यामुळे कमीत कमी अपेक्षा ठेवा, असा सल्ला फडणवीसांनी भाजप नेत्यांना दिला आहे.