मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या सुरु असलेल्या सत्ता संषर्षाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय वाटतं? बंडखोरीविषयी आणि भविष्यातील निवडणुकांविषयी त्यांची मते एका वादळी मुलाखतीमध्ये मांडली आहेत. ही मुलाखत शिवसेनेते मुखपत्र सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत हे घेत आहेत. या मुलाखतीच्या टीझरवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.
या मुलाखतीचा आज दुसरा टिझर रिलीज झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली आहे. ही मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावर सौम्य लाईटही आहे. त्यावरुनच निलेश राणे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर टीका केली आहे.
निलेश राणेंनी एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यानंतर एक मुलाखत झाली होती तेव्हाचा फोटो आणि सत्ता गेल्यानंतर होणाऱ्या मुलाखतीचा फोटो वापरला आहे. पहिल्या फोटोत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही आणि आताच्या मुलाखतीत फोटो वापरला यावरुन निलेश राणेंनी निशाणा साधला आहे.
उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात, असे निलेश राणे म्हणाले आहेत. दोन्ही मुलाखतीच्या फोटोमधील फरक दर्शवत निलेश राणेंनी ठाकरेंच्या मुलाखतीवर टीकास्त्र सोडले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची वादळी मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीमध्ये ठाकरेंनी शिंदेंच्या बंडखोरीबाबत, शिवसेना पक्षाबाबत भाष्य केले आहे.