Maharashtra News: राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विविध दहा निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये महापालिकांची प्रभाग रचना आणि जिल्हा परिषदांच्या गटरचनेसंबंधी महत्वाचे निर्णय झाले आहेत. महापालिकेत पुन्हा २०१७ मधील प्रभाग रचनाच लागू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हे निर्णय झाले. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी ५५ आणि जास्तीत जास्त ८५ अशी सदस्य संख्या अशी आहे. ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान ५० जागा देण्यात येतील. त्यामुळे आता गट आणि आरक्षणातही बदल होणार असून ही प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येणार आहे.