Ahmednagar News :मागील तीन वर्षात या भागाला कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी समाधानकारक मिळाले नसल्याने राज्यात सत्ता परिवर्तन होताच भोसा खिंडीद्वारे सिना धरणात पाणी सोडण्यात आले.
सीना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी हा सत्ता परिवर्तनाचा परिणाम असल्याचे मत आमदार प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केले.
घोगरगाव येथे भोसा खिंडीद्वारे सिना धरणात आलेल्या पाण्याचे जलपूजन आ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार शिंदे पुढे म्हणाले, या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने व शेतकऱ्याकडून कुकडी ओव्हरफ्लो पाण्याची होत असलेली मागणी या अनुषंगाने कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी भोसा खिंडीद्वारे सिना धरणात सोडण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे भागातील बहुतांशी पाझर तलाव भरले असून डाव्या कालव्याद्वारे पूर्ण क्षमतेने पाणी सोडलेले आहे. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या पर्जन्यमान कमी असलेल्या भागाला कुकडी ओव्हरफ्लोचे मुबलक पाणी देण्याबाबत आपण कुकडीचे कार्यकारी संचालक यांना सूचना दिल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील करपडी, परीटवाडी, काळेवाडी या भागाला देखील पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सिना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आल्याने आ.राम शिंदे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला..