‘हर घर तिरंगा’ अभियानाचा प्रचार जोरात सुरू असला तरी यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमध्येच ध्वजसंहितेचे उल्लंघन झाले आहे. याकडे नगरमधील प्राध्यापक सतीश शिर्के यांनी लक्ष वेधले आहे.
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाकडून राष्ट्रध्वज कसा फडकवायचा यासंदर्भात एक चित्रफित प्रसारित केली त्यामध्ये हा प्रकार झाल्याचा शिर्के यांचा दावा आहे.
प्रा. शिर्के यांनी सांगितले की, या चित्रफीतीमध्ये एका ठिकाणी ध्वज पताकाप्रमाणे आडवा फडकवला आहे. ध्वज फडकविताना केशरी रंग नेहमी वरच्या बाजूला असावा, या नियमाचे उल्लंघन झाले आहे.
दुसऱ्या ठिकाणी ध्वज दरवाजावर तोरणासारखा लावला आहे. एका ठिकाणी घरावर किंवा अंगणात फडकविण्याऐवजी तो घराच्या संरक्षक भिंतीवर फडकवल्याचे दाखविले आहे.
ही बाब अतिशय गंभीर असून सरकारी यंत्रणे कडूनच अशा पद्धतीने चुकीची माहिती दिली जात असल्यास जनतेत संभ्रम निर्माण होतो.
सध्या २५ सेकंदाची ही चित्रफित सर्व सोशल मीडियावर फिरत आहे. ती सरकारने त्वरीत हटवून योग्य ती चित्रफित तयार करून प्रसारित केली पाहिजे, असे शिर्के यांनी म्हटले आहे.