विद्रोही साहित्य विचार मंच संस्था तर्फे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नगरमध्ये एकदिवसीय ‘भारत माझा देश आहे’ हे साहित्य संमेलन स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला होणार आहे. रविवार दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते संध्या. ६ या वेळेत नगर मधील चाणक्य चौकातील अंकुर लॉन येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव अमोल घाटविसावे यांनी दिली.
साहित्य संमेलनाची अधिक महिती देताना संस्थेचे अध्यक्ष राजू वाघमारे म्हणाले, जुन २०२२ मध्ये पुण्यात संस्थेचे पहिले विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी झाले. प्रख्यात लेखक व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाच्या यशानंतर आता नगरमध्ये संस्थेचे दुसरे मोठे एकदिवशीय विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे

. ह्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक, गीतकार व अभिनेते बाबासाहेब सौदागर हे असणार आहेत. तर उद्घाटक म्हणून नगरमधील ई जोश इलेक्ट्रिक बाईकचे निर्माते उद्योजक श्रीकृष्ण जोशी आणि स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गझलकार डॉ. नंदकिशोर दामोदरे आहेत.
संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश घोडके यांनी सांगितले, नगर मध्ये होणाऱ्या या संमेलनाच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, प्रसिद्ध व्यंगचित्रकार व लेखक, डॉ.सुहासभाई मुळे, सामाजिक कार्यकर्ते धनेश बोगावत, ॲड.संतोष गायकवाड, पत्रकार व लेखक अशोक निंबाळकर, विंचवाचे तेल फेम लेखिका सुनिता भोसले व डॉ.गुंफा कोकाटे आदी उपस्थित असणार आहेत.
दोन सत्रात संपन्न होणाऱ्या या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये ‘संवाद संविधानाचा’ या विषयावर कवी, लेखक व दिग्दर्शक हृदयमानव अशोक हे जनतेशी हितगुज साधणार आहेत. यावेळी संस्थेतर्फे साहित्यातील योगदानासाठी देण्यात येणारा ‘नाठाळांच्या माथी हाणू काठी’ काव्य पुरस्कार प्रा. अलका सकपाळ, राजू गायकवाड (उस्मानाबाद), उत्तम खताळे (नाशिक), ऐश्वर्या नेहे (नगर) आणि कवी देवदत्त सूर्यवंशी (लातूर) ह्यांना प्रदान होणार आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कवी मंडळीचे काव्य यामधे सादर होणार असून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विचारांची मेजवानी संमेलनाच्या माध्यमातून मिळणार आहे. तरी साहित्य प्रेमींनी याचा आस्वाद घ्यावा.असे आवाहन विद्रोही साहित्य विचार मंचातर्फे समन्वयक सुभाष गवळी व आयोजक अनिल गायकवाड यांनी केले आहे.