Maharashtra News:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद देऊन देवेंद्र फडणवीस यांचे महत्व कमी केल्याची चर्चा होती. मात्र, आता दिल्लीसाठी भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्रातून फडणवीस हेच एकनंबरचे नेते असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यापेक्षाही पक्षात फडणवीस यांना मोठे स्थान देण्यात आले आहे. भाजपने राष्ट्रीय पातळीवरील दोन महत्वाच्या समित्यांवरील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
त्यातून हे अधोरेखित झाले आहे. भाजपची सर्वोच्च समिती असलेल्या संसदीय समितीतून मंत्री गडकरी यांना बाहेर ठेवण्यात आले आहे.
तर राष्ट्रीय पातळीवरच्या केंद्रीय निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यातून महाराष्टातून फडणवीस हेच मोठे नेते असल्याचा संदेश पक्षाने दिला आहे.
राज्यात महत्वाचे स्थान असलेल्या फडणवीस यांची आता पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरील मोठा नेता, अशी ओळख झाली आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाची पुर्नरचना करण्यात आली आहे.
यामधून नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांना वगळण्यात आले आहे. तर येडीयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल यांचा समावेश करण्यात आला आहे.
एका बाजूला गडकरी यांना वगळले तर दुसऱ्या महत्वाच्या समितीत फडणवीस यांना घेण्यात आले आहे. यातून भाजपने योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.