Ahmednagar News: जिल्ह्यातील विविध भागातून भाजीपाल्याची आवक होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात कमी अधिक पाऊस होत असल्याने भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे.
परिणामी आवक घटून शहरात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यात प्रामुख्याने मेथी, कोथींबिर ५० तर वांगी ६०, गवार, हिरव्या मिरचीने शंभरी पार केली आहे.
सध्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरलेला असून अनेक भागात अतिवृष्टी, ढगफुटी सारखे प्रकार झाले आहेत. त्यामुळे आधीच महागाईच्या वणव्यात सापडलेला सर्वसामान्य माणूस पुरता होरपळून निघत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलसह गॅसचे दर गगनाला भिडलेले आहेत.
पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले असून सध्या इतर भाज्यांबरोबर कोथिंबीरची आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी ५० रुपये जुडी, तर हिरवी मिरची व गवार चक्क १०० रूपये किलो या दराने विकली जात आहे.
पुढील महिन्यात नवी आवक सुरू होताच कोथिंबीर दरात घट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र पावसाने झालेल्या नुकसानीमुळे आताच काही सांगत येणे शक्य नाही. कोथिंबीरसह भाज्यांच्या किंमतीही भडकल्या आहेत. मात्र शहरात कोथिंबीर सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर गेली आहे.
राज्यात सध्या लांबलेल्या पावसाने सर्वच स्थानिक पिकांना चांगले झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार पावसाने कोथिंबीर जागेवरच खराब झाली आहे.
परिणामी, सध्या कोथिंबीरिचा तुटवडा जाणवत आहे. एकीकडे पेट्रोल, डिझलचे दर गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे घरगुती सिलिंडर ११०० रूपयांना पडत आहे. त्यामुळे आता जीवनाश्यक गरजांची पुर्तता करताना मेटाकुटीला आलेल्या नागरिकांचे भाजीपाल्यानेही कंबरडे मोडले आहे.