Ahmednagar News : आता फक्त महापालिका विकणे बाकी उरले आहे !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : आयुक्त, उपयुक्तांच्या मान्यतेसह मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील पाणीपुरवठा योजनेचा खाजगीकरणाचा प्रस्ताव सादर केला आहे.

काँग्रेसने यावर जोरदार टीका केली असून आता फक्त महापालिका विकणे बाकी उरले आहे, असा घाणाघात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपावर केला आहे. दरम्यान, सोमवारी काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ आयुक्तांची या विषयाबाबत भेट घेऊन खाजगीकरणाला विरोध करणार आहे.

काळे यांनी म्हटले आहे की, नागरिकांना नियमित, मुबलक व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी आहे.

त्यासाठी मनपा नागरिकांकडून मोठ्या रकमेची कर आकारणी करते. नागरिकांनी कर भरला नाही तर नळ कनेक्शन तोडते.

यापूर्वी शहरातील पथदिव्यांचा प्रकल्प मनपाने खाजगीकरणातून केला. यात महाघोटाळा झाला. ३२ हजार एलईडी दिवे लावण्याचे निश्चित असताना हजारो दिवे गायब केले गेले.

खासगीकरणापूर्वी पथदिव्यांसाठी ३० ते ३२ लाख रुपयांचा वीज बिलाचा खर्च येत होता. खाजगीकरणानंतर या बिलामध्ये कोणतीही घट झाल्याचे दिसून येत नाही.

तसेच खाजगी ठेकेदाराने मनपाने दिलेल्या कोणत्याही अटींचे पालन केलेले नसून शहर आजही अंधारात आहे. कचरा संकलन योजनेचे देखील मनपाने यापूर्वी खाजगीकरण केले.

कोरोना काळातही हजारो टन कचरा वाहून नेल्याची खोटी बिले लावली गेली. यावरून पोलिसात फिर्यादी पण दाखल झाल्या असून चौकशी सुरू आहे.

काळेंनी म्हटले आहे की, नगरकर जनतेला अंधारात ठेवत मनपाचा धक्कादायक प्रकार म्हणजे महापालिकेने काही महिन्यांपूर्वीच ह्यजिओइन्फो सर्व्हिसेस या खाजगी संस्थेकडून पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणाबाबतचे सर्वेक्षण पूर्ण केले असून फेब्रुवारी महिन्यातच त्याचा प्रस्ताव मनपाकडे दाखल झाला आहे.

📍 मनपा तिजोरीवर पुन्हा डल्ला मारण्याचा डाव :

मनपाच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाच्या शुभारंभासाठी शहरात लोकप्रतिनिधी, पुढारी फोटोसेशन करताना नगरकरांना पाहायला मिळतात. महापालिकेच्या प्रत्येक गोष्टीची खबरबात हे पुढारी ठेवत असतात. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणाचा मनपा प्रशासनाने महासभेपुढे ठेवलेला प्रस्ताव हा राजकीय पाठिंब्या शिवाय येऊ शकत नाही.

भ्रष्ट पुढारी आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या आर्थिक संगणमतातून हा घाट घातला जात असण्याची दाट शक्यता असून यातून पुन्हा एकदा कचरा संकलन योजना खाजगीकरण, पथदिवे खाजगीकरण घोटाळ्याप्रमाणे पाणीपुरवठा योजना खाजगीकरणातून मनपाच्या तिजोरीवर पुन्हा डल्ला मारण्याचा डाव असल्याचा हल्लाबोल काळे यांनी केला आहे. मात्र नगरकरांच्या हिताच्या दृष्टीने हा डावा आम्ही हाणून पाडू असे काँग्रेसने म्हटले आहे.

📍 मंगळवारी काँग्रेस निविदा प्रसिद्ध करणार :

सोमवारी काँग्रेस शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे. मनपा एकामागे एक सर्व जबाबदारी झटकून खाजगीकरण करत आहे. कोणता पक्ष सत्तेत, कोणता पक्ष विरोधात हेच नागरिकांना कळेनासे झाले आहे. त्यामुळे मनपात सर्वांचीच आळीमिळी गुपचिळी सुरू आहे.

यामुळे मनपा प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. कुंपणच शेत खाऊ लागले आहे. या सगळ्यात मात्र खड्डे, पाणी, पथदिवे, कचरा अशा मूलभूत प्रश्नांमुळे नगरकर मात्र हैराण आहेत.

एकेक विभाग खाजगीकरण करण्याचा सपाटा लावलेल्या मनपात उद्या आयुक्त, उपायुक्त आणि सर्वच यंत्रणा एखाद्या खाजगी कंपनीला विकण्याचा घाटही घातला तर नगरकरांनी आश्चर्य वाटून घेऊ नये.

मनपाच्या खाजगीकरणाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी उपहासात्मक निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे किरण काळे यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसची निविदा काय व कशी असेल याबाबत नगरकरांमध्ये मात्र चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe