Ahmednagar News:जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानच्या ठिकाणी भाविकांची लूट केल्याच्या घटना घडत आहेत. आता तर चक्क पूजेचे साहित्यच फेकून मारल्याची घटना घडली आहे.
पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवीगडावर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चारचाकी गाडीवर स्थानिक व्यावसायीक महिलांनी पूजेचे साहित्य फेकल्याने चार चाकी गाडीची काच फुटून महिला भावीक जखमी झाली आहे.
त्यानंतर याच महिलांनी हुजत घालून त्याच्या खिशातील पैसे काढून घेतल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका महीलेस अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी नगर तालुक्यातील वायकर कुटुंबिय चारचाकीने मोहटा देवी गडावर दर्शनासाठी आले होते.
त्यांची गाडी गडाच्या पायथ्याला असताना पूजेचे साहित्य विकणाऱ्या महिलेने नारळ व पूजेचे साहित्य असलेली प्लास्टिकची पिशवी गाडीच्या दिशेने फेकली.
ती गाडीच्या काचेला नारळ लागल्याने गाडीची काच फुटली. त्याच दरम्यान दुसऱ्या एका महिलेने देखील पूजेच्या साहित्याची पिशवी गाडीत फेकली यातील नारळ वायकर यांच्या पत्नीच्या डोळ्याला लागल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत विचारणा करत आम्हाला पूजा साहित्य नको परत घ्या. असेम्हणताच जास्त बोलू नको गुपचूप दोनशे रुपये काढून दे असे म्हणून संबंधित व्यावसायिक महिलांनी वायकर यांना धक्काबुक्की केली.
त्यांच्या खिशातील तीनशे रुपये बळजबरीने काढून घेतले. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील एक महिला ताब्यात घेतली आहे.