Asia Cup 2022: आशिया चषक टी-20 (Asia Cup T20) स्पर्धेत मंगळवारी भारताला (India) श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
सुपर फोर फेरीतील या पराभवामुळे भारत आशिया कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. श्रीलंकेपूर्वी भारतीय संघाला सुपर-4 फेरीतच पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पराभवाला सामोरे जावे लागले होते.

मात्र, तरीही टीम इंडिया (Team India) अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करू शकते. यासाठी त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या (Afghanistan) विजयावर तसेच इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.
10 महिन्यांपूर्वी झालेल्या टी-20 विश्वचषकातही भारतीय संघासमोर असेच काहीसे समीकरण उभे राहिले होते. पण त्यानंतर काहीही त्याच्या बाजूने गेले नाही आणि टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 फेरीतून बाहेर पडली.
सुपर-4 राउंड प्वाइंट्स टेबल
सुपर फोरच्या गुणतालिकेत श्रीलंका आता दोन विजयांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तान एका विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोघांचा नेट रन रेट पॉजिटिव आहे.
श्रीलंकेचा नेट रन रेट +0.351 आहे, तर पाकिस्तानचा नेट रन रेट +0.126 आहे. त्याच वेळी, भारत निगेटिव नेट रन रेट (-0.125) आणि दोन पराभवांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान -0.589 नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर आहे.
भारतीय संघाला अजूनही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. मात्र भारतासाठी पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील सामना महत्त्वाचा आहे. आज जर पाकिस्तान संघ जिंकला तर भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आशिया चषकातून बाहेर होतील.
आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत कसा पोहोचेल?
7 सप्टेंबर : अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला. 8 सप्टेंबर : भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला. 9 सप्टेंबर : श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला. भारताचा नेट रन रेट पाकिस्तान-अफगाणिस्तानपेक्षा चांगला असायला हवा. 11 सप्टेंबर : भारत विरुद्ध श्रीलंका फायनल.
अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान
आज 7 सप्टेंबरला अफगाणिस्तानचा सामना पाकिस्तानशी सामना होत आहे. अफगाणिस्तानचा संघ सुपर फोर फेरीतील पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध हरला आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवावा, अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना करावी लागणार आहे.
अफगाणिस्तानने यंदाच्या आशिया कपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाची गोलंदाजी अतिशय मजबूत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला विजयाची संधी आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
8 सप्टेंबर रोजी भारतीय संघ सुपर फोर फेरीतील शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. भारतीय संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.
अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवल्यास आणि भारतीय संघाने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्यास अंतिम फेरी गाठण्याची शक्यता आहे.मात्र, यासाठी टीम इंडियाला आणखी एका सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान
9 सप्टेंबरला श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतील. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानला हरवले तर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचू शकते.
अशा परिस्थितीत टीम इंडियाला अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल जेणेकरून त्याचा नेट रन रेट अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्हीपेक्षा चांगला असेल कारण अशा परिस्थितीत भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला सुपर फोर फेरीत प्रत्येकी एक विजय मिळणार .चांगला नेट रनरेट असलेला संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. श्रीलंका अंतिम फेरीसाठी जवळपास पात्र ठरला आहे.
पाकिस्तान जिंकला तर भारत-अफगाणिस्तान बाहेर
ही तीन समीकरणे बरोबर राहिल्यास भारतीय संघ 11 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. मात्र, यासाठी पाकिस्तानला आपले दोन्ही सामने गमवावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे भवितव्य पाकिस्तानच्या पराभवावर अवलंबून आहे. आज 7 सप्टेंबर रोजी जर पाकिस्तान जिंकला तर ही सर्व समीकरणे बदलणार आणि केवळ टीम इंडियाच नाही तर अफगाणिस्तानचा संघही आशिया कपमधून बाहेर पडेल.













