कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार !

Ahmednagarlive24
Published:

मॉस्को : कोरोना व्हायरसचा उगम चीनच्या हुबेई प्रांतात झाल्याचे शास्त्रज्ञांनी सप्रमाण सिद्ध केले आहे; पण रशियन माध्यमांनी या प्राणघातक विषाणूमागे पाश्चिमात्य राष्ट्रांचा विशेषत: अमेरिकेचा हात असल्याचा अजब दावा करून खळबळ उडवून दिली आहे.

रशियाचे ‘चॅनल वन’ आपल्या ‘रेम्या’ (टाइम) नामक प्राइम टाइम कार्यक्रमात ‘कोरोना’वर चर्चा करत आहे. त्यात कोरोनाच्या प्रसारामागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा केला जात आहे.

कोरोनाचा विषाणू ‘क्राऊन’सारखा दिसतो. त्यामुळे शास्त्रज्ञांनी त्याला ‘कोरोना’ हे नाव दिले आहे; पण ‘रेम्या’च्या निवेदकाने हा दावा साफ फेटाळून लावला आहे. ‘कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार आहेत. कारण ते नेहमीच सौंदर्य स्पर्धांना हजेरी लावून विजेत्या स्पर्धकाला क्राऊन प्रदान करतात,’ असे त्याने म्हटले आहे.

कोरोनाचा लॅटीन व रशियन भाषेत ‘क्राऊन’ असा अर्थ होतो. विशेष म्हणजे या कार्यक्रमात येणारे तज्ज्ञही कोरोना ‘कृत्रिम’ असल्याचा दावा करत; यामागे अमेरिकन गुप्तहेर संघटना व औषध कंपन्या असल्याचा तर्क मांडत आहेत.

‘अमेरिकेने जॉर्जियात एक प्रयोगशाळा तयार केली आहे. या प्रयोगशाळेत मनुष्यावर रासायनिक शस्त्रांची चाचणी घेतली जाते. या चाचणीमुळेच कोरोनाचा फैलाव झाला. आता अमेरिकन औषध कंपन्या यावर लस शोधून बक्कळ पैसा कमावतील,’ असे त्यांचे मत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment