‘आरएसएस’चे नेते दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर!

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नेते व कार्यालये जागतिक दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर असल्याची माहिती गुप्तचर संस्थेच्या हाती लागली आहे.

दहशतवादी या हल्ल्यासाठी आयईडी (इम्प्रुवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) ने भरलेल्या वाहनांचा वापर करण्याची शक्यता असल्याचा इशाराही यंत्रणेने दिला आहे. या इशाऱ्यासोबतच संबंधित राज्यांना सुरक्षा बंदोबस्त वाढविण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे समजते. दहशतवाद्यांनी महाराष्ट्र, पंजाब तसेच राजस्थानातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्वाचे नेते, कार्यालये तसेच पोलीस स्थानकांवर हल्ल्याचा कट आखल्याची माहिती गुप्तचर संस्थेच्या हाती लागल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

जागतिक पातळीवर सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटना किंवा अज्ञात व्यक्तीकडून येत्या काही दिवसांत हा हल्ला केला जाऊ शकतो, असा अलर्ट गुप्तचर संस्थेने जारी केला आहे.

आयईडी स्फोटकांद्वारे किंवा आयईडी ठेवलेले वाहन संघाशी संबंधित ठिकाणांवर अथवा व्यक्तींवर भिडवून घातपात घडविण्याचा मनसुबा दहशतवाद्यांकडून पूर्णत्वास नेला जाण्याची शक्यताही गुप्तचर संस्थेने वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणेने संबंधित राज्यांना इशारा जारी करीत सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांकडून समजते.

यानुसार महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आसामातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment