Ahmednagar News:शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणी पहावयास मिळाले.दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली, पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली, तब्बल दोन ते अडीच तास पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले होते, तर सखल भागाला जलाशयाचे स्वरुप आले होते.
यात पारनेर तालुक्यातील गारखिंडी सह अळकुटी,रांधे, कळस,चोंभुत व दरोडी या गावात ढगफुटी सदृश झालेल्या जोरदार पावसामुळे खूप नुकसान झाले आहे.
पावसामुळे आलेल्या पुरामध्ये अळकुटी-पारनेर रस्त्यावरील पुलावरून एक मोटरसायकल व एक चारचाकी गाडी वाहून गेली आहे.
यात गारखिंडी गावामधील नऊ ते दहा नाला बिल्डिंगसह तीन पूल पुराच्या पाण्यामुळे खचले आहेत. शेतीमालाचे जवळजवळ शंभर टक्के नुकसान झाले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, तूर,मूग, बाजरी, उडीद व कांद्याचे रोप १००% पाण्याखाली गेले आहे.
गावामध्ये पर्जन्यमापक यंत्र आहे त्यामध्ये साडेसहाशे मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे . कर्जतसह श्रीगोंदा तालुक्यात अनेक गावामध्ये झालेल्या जोरदार पावसाने त्या त्या गावाचा संपर्क तुटला असून,
कुळधरण परिसरात ढगफुटी झाल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक गावे अंधारात असून अनेक मोबाईल कंपन्यांची रेंज गायब झाल्याने तालुक्यातील सोशल मिडियाच बंद पडल्याचे दिसत होते.