शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त रजनी भिमराव जाधव यांना सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. भिंगार येथील भिमागौतमी विद्यार्थिनी आश्रममध्ये मुलींच्या जडण-घडणीत महत्त्वाची भुमिका बजावत, निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाबद्दल आश्रमाच्या अधिक्षिका असलेल्या रजनी जाधव यांना आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, गटनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, विनीत पाउलबुध्दे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भुपेंद्र परदेशी, सुरेश बनसोडे, सिध्दार्थ आढाव, दत्तात्रय राऊत आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सावित्रीबाईंनी महिलांना खर्या अर्थाने जगण्याची दिशा दिली.
आ.संग्राम जगताप म्हणाले की, पुर्वी महिला चूल व मुल या दोन गोष्टींपुरतेच मर्यादित होत्या. उंबरठा ओलांडून सावित्रीबाईंनी महिलांना खर्या अर्थाने जगण्याची दिशा दिली. तर स्त्री शिक्षणाची मशाल पेटवून त्यांनी क्रांती घडवली. महिला दिनी सावित्रीबाईंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज महिला सर्व क्षेत्रात आपली गुणवत्ता सिध्द करत असून, याचे श्रेय सावित्रीबाई फुलेंना जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सावित्रीबाईंमुळे महिलांचा मान-सन्मान वाढला.
प्रा.माणिक विधाते यांनी दरवर्षी निस्वार्थ भावनेने सामाजिक काम करणार्या कर्तृत्ववान महिलांना सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तर महिलांना शिक्षणाची दारे उघडे करुन देणार्या सावित्रीबाईंमुळे सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणार्या महिलांचा मान-सन्मान वाढला असल्याचे सांगितले.