Ahmednagar Politics : कोविड संकटात राज्यातील शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. बाजार समित्या बंद ठेवल्या. शेतकऱ्यांना आपला माल फेकून द्यावा लागला, तरी मागील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कवडीची मदत केली नाही.
ते आता शेतकऱ्यांना काय देणार? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाहाणी दौरा म्हणजे केवळ फार्स असून, अडीच वर्षे घरात बसले, तेच आता शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवायला निघाले असल्याचा खोचक टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर सडकून टीका केली. अडीच वर्षे घरात बसून माझे कुटुंब तुमची जबाबदारी म्हणून ज्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ज्यांनी वाऱ्यावर सोडून दिले होते, तेच आज पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याने आश्चर्य वाटत असल्याचे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषीविषयक निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उत्पादनाला दुप्पट हमी भाव देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा सकारात्मक परीणाम पाहायला मिळत असल्याने आपले तारणहार फक्त पंतप्रधान मोदी आहेत,
ही भावना देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांवरील प्रेम हे बेगडी असल्याचा टोलाही मंत्री विखे यांनी यावेळी लगावला.