अहमदनगर उड्डाणपूल : आमदारांवरील मेहरबानी सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतणारी !

Published on -

प्रतिनिधी : एनएचआयएच्या वतीने सक्कर चौक ते एसबीआय चौक या नवीन उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलाच्या खाली सक्कर चौकापासून ते एसबीआय चौकापर्यंत दोन रस्त्यांच्यामध्ये सर्वत्र कायमस्वरूपी दुभाजक उभारण्यात आले आहेत.

मात्र काही खाजगी आस्थापनांना विशेष सुविधा देण्यात आली असून या ठिकाणी दुभाजक उभारण्यात न आल्यामुळे बेशिस्त वाहतूक, वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांना निमंत्रण मिळणार असल्याचा आरोप, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

एनएचआयएने उड्डाणपुलाचे आणि या पुलाशी निगडीत कामे चुकीच्या पद्धतीने करून नागरिकांच्या जीविताशी खेळू नये, अशी मागणी काळे यांनी पी.आय.यु. अहमदनगर डिव्हिजन एनएचआयएचे प्रोजेक्ट डायरेक्टर मिलिंद वाबळे यांच्याकडे केली आहे. याबाबत काळे यांनी वाबळेंशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत लक्ष वेधले असून मागणीचे पत्र ईमेलद्वारे पाठविले आहेत.

राजयोग हॉटेल, राजासाहाब वाईन्स, अरुणोदय हॉस्पिटल, हॉटेल राजश्री व परमिट रूम या शहराच्या आमदारांच्या असणाऱ्या खाजगी आस्थापनांवर एनएचआयएने विशेष मेहरबानी केली आहे. मात्र ही मेहरबानी नागरिकांच्या जीवावर बेतणारी ठरू शकते, असा घाणाघात देखील काळे यांनी केला आहे. एनएचआयएच्या यंत्रणेने संगनमत करत राजकीय दबावातून ही नागरिकांच्या जीविताशी खेळणारी गंभीर चूक केली आहे.

मुळात आमदारांनी अशा पद्धतीने आपल्या खाजगी फायद्यासाठी सत्तेचा गैरवापर करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कायदा, नियम हे या देशातील प्रत्येक नागरिकासाठी समान आहेत. मात्र नगर शहरामध्ये त्याची अंमलबजावणी तशी होताना दिसत नाही, हे चुकीचे असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे की, उड्डाणपुलाच्या खाली स्वस्तिक चौक आणि त्या लगत असणारे पुणे एसटी स्टँड, इम्पेरियल चौक आणि त्या लगत असणारे माळीवाडा बस स्टॅन्ड, कृषी उत्पन्न बाजार समिती समोरचा चौक, चांदणी चौक या ठिकाणी दुभाजक न ठेवता रहदारीच्या येण्या – जाण्यासाठीची सोय असणे नितांत आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्या वतीने दुभाजक टाकण्यात आलेले आहेत.

याचे निश्चितच स्वागत आहे. मात्र या व्यतिरिक्त अन्य तीन ठिकाणी अनावश्यकरित्या दुभाजक टाकण्यात आलेले नाहीत. यामुळे वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहतूक आणि अपघातांना निमंत्रण मिळत आहे. विशेष म्हणजे स्वस्तिक चौक ते इम्पेरियल चौक यादरम्यान असणाऱ्या यापैकी तीन आस्थापना यामध्ये हॉटेल, परमिट रूम आणि खाजगी हॉस्पिटलचा समावेश आहे.

या तीनही आस्थापनांच्या आधी व नंतर माळीवाडा बस स्थानक आणि पुणे बस स्थानक यासाठी दुभाजक न टाकता चौक वाहतुकीसाठी खुले ठेवण्यात आले आहेत. तरि देखिल अगदी शंभर मीटरच्या अंतरावर आमदारांच्या खाजगी आस्थापनांच्या समोर दुभाजक न टाकता रस्ते खुले ठेवण्यात आले आहेत.

याउलट अन्य ठिकाणी दोन चौकांमध्ये की ज्या ठिकाणी दुभाजक टाकण्यात आलेले नाहीत, अंतर खूप जास्त असून देखील मध्ये कोणत्याही ठिकाणी इतर कोणत्याही खाजगी आस्थापनांना ही विशेष सुविधा एनएचआयएने दिलेली नाही.

यामुळे या रस्त्यावर व्यवसाय करणारे इतर व्यवसायिक जसे की, गॅरेज चालक, शिलाई मशीन दुकानदार, फर्निचर, पान शॉप, हॉटेल, हॉस्पिटल, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या, व्यापाऱ्यांची दुकाने, गाड्यांचे शोरूम, फुल विक्रेते, कापड विक्रेते, भेळ विक्रेते, चहा विक्रेते, एटीएम, मोबाईल शॉपी, चप्पल दुकानदार, स्वीटस् शॉप्स, बेकरी शॉप्स, मेडिकल दुकाने,

रिक्षा स्टँड, एलपीजी गॅस स्टेशन, खाजगी बँका, जिल्हा सहकारी बँक, महावीर कलादालन, ज्वेलर्स, खाजगी सदनिका, सेवाभावी संस्था कार्यालये, शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने, पेट्रोल पंप आदी अन्य खाजगी व्यवसायिकांच्या दारात देखील वर अन्य तीन ठिकाणी देण्यात आलेली विशेष सूट या सर्व व्यावसायिकांना का देण्यात आली नाही ? हा प्रश्न आहे.

एनएचआयएला जर आमदारांना विशेष सुविधा देत वाहतूक कोंडी बेशिस्त वाहतूक आणि अपघातांना निमंत्रण द्यायचे असेल, तर हे निश्चितच चुकीचे आहे. मात्र जर त्यांना विशेष सुविधा देणार असाल तर या रस्त्यावर असणाऱ्या अन्य व्यावसायिकांना या विशेष सुविधांचा आपण लाभ का देऊ नये ? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

मात्र हे सर्व करत असताना कोणत्या परिस्थितीमध्ये अन्य व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही, नागरिकांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची देखील जबाबदारी आपल्या यंत्रणेची तसेच या विषयाशी निगडीत सर्व यंत्रणांची आहे, याची नोंद घ्यावी.

या अनुषंगाने आवश्यक ती उचित कार्यवाही तातडीने करावी, अशी आम्ही काँग्रेसने शहरातील नागरिकांच्या वतीने केली आहे. एनएचआयएच्या विशेष मेहरबानीमुळे शहराच्या आमदारांची खाजगी व्यावसायिक आस्थापना असणाऱ्या राजासाहाब वाईन्स,

अरुणोदय हॉस्पिटल समोर दुभाजक न टाकल्याने एक ट्रक रॉंग साईडने ट्रक पेट्रोल पंपाकडे नेत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. दुभाजक न टाकल्याने बेशिस्त वाहतूक, वाहतूक कोंडी आणि अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News