Shivsena : राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडून दोन गट निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मात्र आता पुन्हा एकदा ठाकरे गटात आणखी फूट पडणार असल्याची चर्चा होत आहे.
ठाकरे गटातील आणखी काही आमदार आणि खासदार नाराज असल्याचा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून केला जात आहे. ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार अस्वस्थ असल्याने ते रात्री अपरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील उर्वरित आमदार आणि खासदारही फुटणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
खासदार प्रतापराव जाधव हे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार मुख्यमंत्र्यांनाच नव्हे तर भाजपच्या मंत्र्यांनाही रात्री बेरात्री एकांतात भेटत असतात. हे अस्वस्थ आमदार सह्याद्रीवर येऊन भेटत असतात. मी स्वत: पाहिलं आहे. अनुभवलं आहे असा दावा त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या 40 आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी बंड करत उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली आहे.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने सत्ता स्थापन करून पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. तसेच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही केला नाही. त्यामुळे राज्यातील सरकार दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.