Samana : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यपालांवर सडकून टीका होत आहे. सामनातून राज्यपालांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसही चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजभवनावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यपालांविरोधात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
सामनातून राज्यपालांवर टीका करताना म्हंटले आहे की, “शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात.
हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे असे महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचे वैयक्तिक मत आहे” अशी सडकून टीका करण्यात आली आहे.
तसेच सामनातून राज्यपालांना इशारा देखील देण्यात आला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.
राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर भाजप आणि शिंदे गट कसा आक्रमक झाला होता त्यावरून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
वीर सावरकर यांचा राहुल गांधी यांच्याकडून ‘माफीवीर’ असा उल्लेख झाला. महाराष्ट्रात पोहोचलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत श्री. गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतले तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला.
त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले. त्यांनी “शिवसेना आता काय करणार? असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला.
आता हे सर्व जोडे स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली व छत्रपती शिवरायांचा अपमान केला, अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे.