Maharashtra Politics : “अघोरी विद्येचे लोक अघोरी विद्येवर अधिक विश्वास ठेवतात”; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Published on -

Maharashtra Politics : शिवसेना खासदर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भविष्य बघण्यावरून टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिरजगावमधील एका ज्योतिष्याकडे गेल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. आता संजय राऊतांनीही टीका करण्याची संधी सोडली नाही. तसेच सीमा प्रश्न वादावरून संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

संजय राऊत म्हणाले, अघोरी विद्येचे लोक अघोरी विद्येवर अधिक विश्वास ठेवतात. अघोरी विद्येच्या मागे पळणाऱ्यांचा अंतही अघोरीच होतो, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे, ज्यांचं आत्मबल आणि आत्मविश्वास कमी असतो. ते अशा प्रकारच्या जंतरमंतर आणि मंत्रतंत्रात जातात. ज्योतिष विद्येच्या मागे लागतात. लागू द्या. महाराष्ट्रातील जनतेने त्यांचं भविष्य ठरवलं आहे. त्यांचं भविष्य काय आहे हे सर्वांना माहीत आहे.

त्यामुळेच ते कुंडली दाखवत आहेत. त्यांच्या कुंडलीत काही महिन्यात सत्ता योग नाहीये. त्यांची कुंडली स्पष्ट सांगत आहे. माझाही कुंडलीचा अभ्यास आहे, असा टोमणाही संजय राऊत यांनी मारला आहे.

तसेच संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्यावरूनही टोला लगावला आहे. ते म्हणाले, त्यांना गुवाहाटीला जाऊ द्या नाही तर लंकेला जाऊ द्या किंवा आफ्रिकेला जाऊ द्या.

राज्यातील जनतेच्या हृदयातून त्यांचं स्थान नष्ट झालं आहे. ते इथे गेले काय आणि तिथे गेले काय, जमिनीखाली गेले काय आणि आकाशात गेले काय काय फरक पडतो? असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

सीमावादाच्या प्रश्नावरूनही संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. हे खोके सरकार आहे. प्रत्येकवेळी खोक्याची बात करतात. त्यांना दिल्लीतून पैसे आले तर महाराष्ट्रातील जमीन सोडतील. त्यांना राज्याशी काही घेणं देणं नाही. राज्यावर त्यांचं प्रेम नाही, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News