Pune News : पुण्यात सध्या G-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुशोभीकरणाला वेग आला आहे. शहरात सध्या रस्ते विकासाची कामे आणि रंगरंगोटीची कामे जोमात सुरू आहेत. यामुळे पुणेकर जी20 येते घरा तोची दिवाळी दसरा सेलिब्रेट होत असल्याने समाधानी असल्याचे चित्र आहे. निदान जी-20 च्या पार्श्वभूमीवर तरी महापालिका यंत्रणेला आपल्या कर्तव्याची जाण आली असा खोचक पुणेरी टोमणा देखील यावेळी नागरिकांकडून लगावला जात आहे.
दरम्यान आता या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने विमानतळ ते सेनापती बापट हा मार्ग सुशोभीकरण झाला आहे अगदी त्याच धर्तीवर पुण्यातील एकूण दहा रस्त्यांचा कायापालट करण्याचा महापालिकेचा मास्टर प्लॅन समोर आला आहे.

एवढेच नाही तर पालिकेची हद्द सुरू होणाऱ्या ठिकाणी नावाच्या पाट्या, पुणेरी पाट्या नव्हे बरं रस्त्यांच्या नावांच्या पाट्या म्हणजे नामफलक लावण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे. खरं पाहता, या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील रस्त्यांवर शोभेची झाडे लावणे, खड्डे दुरुस्ती करणे, वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी पट्टे आणि वाहतूक चिन्ह, पदपथ व रस्ता दुभाजकाची रंगरंगोटी इत्यादी कामे महापालिकेकडून करण्यात आली आहेत.
यामध्ये विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान आता याचं पार्श्वभूमीवर शहरातील आणखी 10 रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. या रस्त्यांचे देखील सुशोभीकरण करण्याचे काम महापालिकेकडून हाती घेतले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. या रस्त्यांवर आता पुन्हा खोदाई होणार नाही, याची दक्षता घेण्यासोबतच डांबरीकरण, रस्ते दुभाजकांची दुरुस्ती इत्यादी कामे पार पाडली जाणार आहेत.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पुणे महापालिकेकडून शहरात येणाऱ्या रस्त्यांचे सुशोभीकरण केलं जाणार आहे. यामध्ये अहमदनगर रोड, सातारा रोड, सोलापूर रोड, पुणे-मुंबई जुना हायवे रोड, सिंहगड रोड, मगरपट्टा ते चंदननगर बायपास इत्यादी एकूण दहा रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान या 10 रस्त्यांच्या कामांमध्ये दुभाजकांची दुरुस्ती, खड्डे भरणे, झेब्रा क्रॉसिंग, मध्यभागी असलेल्या पट्ट्या रंगविणे, साईन बोर्ड लावणे इत्यादी कामांचा समावेश राहणार आहे.
एवढेचं नाही तर महापालिकेची हद्द सुरू होताना स्वागत करणारा आणि संपताना धन्यवाद मानणारा नामफलक लावण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. एकंदरीत G-20 परिषदेमुळे पुणेकरांना चांगल्या सुशोभित रस्त्यांवर प्रवास करण्याच अहो भाग्य लाभणार आहे, यामुळे प्रत्येक पुणेकर सध्या G-20 परिषदेला धन्यवाद फलक न लावता देत असल्याचे चित्र आहे.