Maharashtra News : नव्याने सुरू होणारी मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे सुरू करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुजय विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आले आहे. शिर्डीला जाण्यासाठी पुणे येथून केवळ एकच रेल्वे आहे आणि ती देखील आठवड्यात केवळ चार दिवस धावते.
तसेच अहमदनगर-पुणे इंटरसिटी किंवा अहमदनगर-मुंबई याची मागणी देखील अनेक वर्षापासूनची आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनल्स (सीएसटी) पासून सुरू होणारी वंदे भारत ट्रेन ही नाशिक, मनमाड मार्गे शिर्डीला येणार असल्याचे कळत आहे. मुंबई-पुणे-दौंड-अहमदनगर- शिर्डी अशी एकच रेल्वे आहे आणि तिची वेळ पण मुंबईवरून तसेच शिर्डी वरुन जाताना रात्रीची असल्याने प्रवाशांना गैरसोयीचे ठरत आहे.
वंदे भारत ट्रेन ही पुणे मार्गे शिर्डीला नेल्यास संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याला फायदा होणार आहे. तसेच पुणेकरांना देखील याचा फायदा मिळेल अशी अपेक्षा प्रवासी संघटनेचे हरजीतसिंह वधवा यांनी व्यक्त केली आहे.
पुणे ते नगर इंटरसिटी रेल्वेची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे. ही नवीन वंदे भारत ट्रेन पुणे मार्गे सुरु केल्यास व्यापारी, विद्यार्थी, सामान्य नागरिक आणि साई भक्तांना याचा फायदा होणार आहे. दररोज नगर ते पुणे प्रवास करीत असताना महामार्गावर वाहतूक कोंडी अपघात आणि बराच वेळ प्रवासात जातो.
मुंबईतून मनमाड मार्गे शिर्डीला दर चार दिवसाला एक रेल्वे आहे. मुंबई-नाशिक मार्गे मनमाडला येण्यासाठी दर अर्ध्या तासाला गाड्या व इंटरसिटी देखील आहे. मनमाडला उतरल्यानंतर रस्त्याने शिर्डीला जाण्यासाठी वाहतुकीचे बरेच साधने उपलब्ध आहेत.
मुंबई मार्गे शिर्डी 350 कि.मी. आणि पुणे मार्ग शिर्डी देखील सारखे अंतर पडते. रेल्वे प्रशासनाने वंदे भारत ट्रेन नगर मार्गे सुरु केल्यास नगर-पुणे मार्गावर वाहतूक कोंडी कमी होऊन अनेक लोकांचा वेळ वाचणार असल्याचे अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या मागणीसाठी संघटनेचे हरजीतसिंह वधवा,
क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य प्रशांत मूनोत, स्थानिक रेल्वे सल्लागार समिती सदस्य विपुल शहा, अशोक कानडे, संदेश रपारिया, सुनील छाजेड, संजय सपकाळ, संजय चव्हाण, अजय दिघे, संजय वाळूंज, संतोष बडे, महेश शहाणे आदी प्रयत्नशील आहेत.