IRCTC Ganga Sagar Yatra : अनेकांना धार्मिक आणि ऐतिहासिक मंदिरांना भेट द्यायची आवड असते. जर तुम्हालाही अशी आवड असेल तर IRCTC तुमच्यासाठी खास टूर पॅकेज आणले आहे. ज्यात आता तुम्हाला काशीपासून पुरीपर्यंतची प्रसिद्ध मंदिरे दाखवण्यात येणार आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पॅकेजची किंमत जास्त नसून तुम्ही स्वस्तात देशातील सर्वात मोठ्या मंदिरांना भेट देऊ शकता. त्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून भारत गौरव ट्रेन चालवण्यात येत आहे. तुम्हीही याचा पॅकेजअंतर्गत लाभ घेऊ शकता.

या पॅकेजअंतर्गत तुम्हाला एकूण 9 रात्री आणि 10 दिवस प्रवास करावा लागणार आहे. यादरम्यान तुम्हाला काशी विश्वनाथ मंदिर आणि कॉरिडॉर, जगन्नाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर, गंगा सागर तीर्थ, कोलकाता येथील काली माता मंदिर, बैजनाथ येथील बैजनाथ धाम ज्योतिर्लिंग, गया येथील महाबोधी मंदिर आणि विष्णुपद मंदिर यासारख्या लोकप्रिय ठिकाणी नेण्यात येणार आहे.
IRCTC च्या या पॅकेज अंतर्गत प्रवास 16 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तुम्ही उत्तर प्रदेशातील अलीगढ, तुंडला, इटावा, कानपूर आणि लखनऊ येथून प्रवास करता येत आहे.
उच्च श्रेणीतील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पॅकेज अंतर्गत एसी रूम दिली जाणार आहे. तसेच, बजेट श्रेणीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नॉन-एसी रूम दिली जाणार आहे. तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था, लोकेशन गाइड आणि इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध असणार आहेत.
जर याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही सुपीरियर श्रेणी अंतर्गत प्रवास करत असाल तर तुम्हाला 34,390 रुपये मोजावे लागतील. जर तुम्ही दोन किंवा तीन लोकांसह प्रवास करत असाल तर प्रति व्यक्ती भाडे 26,450 रुपये असणार आहे. तसेच स्टँडर्ड क्लासमध्ये एकट्याने प्रवास करत असाल तर तुम्हाला 30,270 रुपये द्यावे लागणार आहेत. दोन किंवा तीन लोकांसह प्रवास करत असताना, तुम्हाला प्रति व्यक्ती 23,280 रुपये भाडे द्यावे लागणार आहे.