Pune : राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत येऊन सात महिने झाले आहेत. या सरकारकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. असे असताना सरकारने सातच महिन्यात जाहिरातीवर खर्च केलेली रक्कम पाहून सामान्य माणसाचे डोळे पांढरे होतील. कारण हा आकडा खूपच मोठा आहे.
सात महिन्यात सरकारने जाहिरातबाजीवर तब्बल ४२ कोटी ४४ लाख रूपये खर्च केले आहेत. करंजेपूल बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती मागविली होती. यामधून हे उघड झाले आहे.
यामध्ये फक्त हर घर तिरंगा अभियानासाठी जाहिरातीवर तब्बल 10 कोटी खर्च झाले आहेत. सातच महिन्यात विविध प्रकारच्या सरकारी जाहिरातींवर ४२ कोटी रूपयांची उधळपट्टी केल्याची बाब समोर आली आहे.
हा आकडा दिवसाला बघायला गेलं तर १९ लाख ७४ हजार रूपये इतका खर्च या सरकारने केला आहे. यामुळे परिस्थिती लक्षात येईल. मोदी सरकारने देखील असाच मोठा खर्च केला आहे. यामुळे त्यांच्यावर देखील टीका करण्यात येत होती.
जतीन देसाई यांनी मागविलेल्या माहितीत मोदी सरकारने २०१९-२० या एकाच वर्षात ७१३ कोटी खर्च केल्याची बाब उघड झाली होती. यामुळे खर्च करण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे दिसून येत आहे.