IMD Rain Alert : थंडीचे अवघे काही दिवस उरले असताना हवामानात सतत बदल होत आहे. कधी तापमानात वाढ होत आहे तर कधी घट होत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत असल्याने अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण तयार होत आहे. तर अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडत आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाल्यामुळे भारतीय हवामान खात्याकडून येत्या २४ तासात १० राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये दाट धुके पडत असल्याने शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक राज्यात पाऊस कोसळणार आहे तर अनेक डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या २४ तास पावसाचे असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
या राज्यांमध्ये पावसाचा इशारा
9 फेब्रुवारीला म्हणजेच आज काश्मीर खोऱ्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते. याशिवाय 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी उत्तर पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यासोबतच पूर्व भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयातील दुर्गम भागात पाऊस आणि गडगडाटाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. IMD ने 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी पंजाबच्या उत्तर भागात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
या ठिकाणी कोसळणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने म्हंटले आहे की 9 ते 10 फेब्रुवारी दरम्यान नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयीन प्रदेशात धडकणार आहे. त्यामुळे शेजारील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये आज आणि उद्या पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.