Satyajit Tambe : काही दिवसांपूर्वी अपक्ष उभा राहून काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी नाशिकमधून विजय मिळवला आहे. या निवडणुकीची मोठी चर्चा झाली. असे असताना या निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसने आम्हाला पक्षाबाहेर ढकलण्याचे सर्व प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
त्यांना भाजपही खुली ऑफर देत आहे. त्यानंतर आज सत्यजीत तांबे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे. यामुळे नगर जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरण जुळून येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, पदवीधर निवडणुकीनंतर मात्र तांबे यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. तांबे म्हणालेत की, अपक्ष निवडणूक आलो आहे, आता अपक्ष म्हणूनच काम करणार आहे. आता ते अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
दरम्यान, विखे आणि थोरात यांचा राजकीय संघर्ष राज्याभरात परिचित आहे. सत्यजीत तांबे हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. यामुळे आता ही भेट नेमकी कशासाठी होती, याची चर्चा नगर जिल्ह्यात रंगू लागली आहे.
असे असताना नाशिक पदवीधर निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. राजेंद्र विखे यांनीही तांबे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मजकूर प्रसिद्ध केला होता. यामुळे आता हा वाद संपला का असा प्रश्न उपस्थित होत आहे.