7th Pay commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सरकार लवकरच पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ करू शकते. जर मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी होळी अगोदर महागाई भत्त्यात वाढ केली होती.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक ही पुढच्या महिन्यात म्हणजे 1 मार्च रोजी होणार आहे. या बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर याचा फायदा पेन्शनधारकांना आणि कर्मचाऱ्यांना होईल.
महागाई भत्त्यात होणार वाढ
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा महागाई वाढण्यावर अवलंबून असतो, याचा अर्थ असा की जितकी महागाई वाढते, तितका महागाई भत्ता वाढतो. यासाठी उद्योग कामगारांची किरकोळ महागाई (CPI-IW) काढली जाते. जर उद्योग कामगारांच्या किरकोळ महागाईचे आकडे पाहायचे झालं तर यावेळी डीए सुमारे 4.23% ने वाढला पाहिजे.
याबाबत ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा असे म्हणतात की, ‘सरकार दशांशानंतरच्या आकड्यांकडे लक्ष देत नाही. अशा परिस्थितीत, यावेळी डीएमध्ये 4% वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. जर असे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्क्यांवरून 42 टक्के होईल.
होणार साडेसात हजार रुपयांची वाढ
महागाई भत्त्यात जी काही वाढ झाली ती जानेवारीपासून लागू करण्यात येते. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डीएची थकबाकी दिली जाते. अशा प्रकारे तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीची थकबाकी मिळेल. हे लक्षात घ्या की केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात बदल करत असते, म्हणजेच जानेवारी आणि जुलैमध्ये बदल केले जातात. सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली तर ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 18 हजार रुपये आहे. त्यांना 7560 रुपये महागाई भत्ता मिळेल.