Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केल असा दावा केला आहे. जे लोक अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्ष घरातच बसून होते, त्यांनी आम्हीच हे काम हाती घेतले असे म्हणणं हस्यास्पद आहे, असे फडणवीस म्हणाले.
तसेच ते म्हणाले, उद्या कुणाचं लग्न झालं तर माझ्यामुळेच झालं म्हणतील. उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील. त्यामुळे ही प्रवृत्ती सोडा, असेही ते म्हणाले. तसेच फडणवीस म्हणाले, मला मुंबईकरांची क्षमाही मागायची आहे. आम्ही एकाचवेळी अनेक कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होणार आहे.
त्यामुळेच प्रदूषण होत आहे. ट्रॅफिक जाम होत आहे. पण काळजी करू नका. दोन तीन वर्षात ही कामे झाली की पुन्हा त्रास होणार नाही. नंतर 30 ते 40 वर्ष त्याकडे बघण्याची गरज पडणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, काही लोकांची सवय अशी असते की, अरे याचा प्रवेश झाला मीच केला. अरे नोकरी लागली, मीच लावली. अरे लग्न झाले मीच जुळवून दिल. अरे पोरगा झाला माझ्यामुळेच झाला.
ही जी सवय आहे ती आता सोडली पाहिजे. आता पोरगा झाला हा त्याच्या कर्तृत्वाने झाला आहे. लग्न केलं तर त्याच्या पसंतीने केले. मला वाटतंय, मीच केलं मीच केलं हे सांगण्याची ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. अरे तुमच्या काळात काहीच झाल नाही, असेही फडणवीस म्हणाले.