Bhaskar Jadhav : काल भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांवर मोठे आरोप केले. यामुळे आता भास्कर जाधव आक्रमक झाले आहेत. मोहित कंबोज म्हणाले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचे तिकिट बुक केले होते, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता.
यावर आता भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत थेट आव्हान दिले आहे. भास्कर जाधव यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला. ‘जर शंभर बापाची पैदास नसेल, तर त्याने यातील एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा’, अस आव्हान जाधवांनी कंबोज यांना दिलं. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोफ डागली.
जाधव म्हणाले, मोहित कंबोज ही व्यक्ती कधी समोर बघितलेली नाही. पण, संपूर्ण चॅनेलच्या माध्यमातून मी जाहीरपणे आव्हान देतोय की, यातील एक तरी आरोप हा मोहित कंबोजसारखा हरामखोर माणूस.. तो जर शंभर बापांची पैदास असेल, तर हा आरोप सिद्ध करणार नाही आणि तो जर शंभर बापाची पैदास नसेल, तर त्याने यातील एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा.
जाधव यांनी फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना माझं जाहीर आव्हान आहे की, आता सुरुवातच झाली असेल… तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्या सत्ता भरपूर आहे. तुमच्याकडे ईडी आहे. तुमच्या बाजूला एनआयए आहे, सीबीआय आहे. तुमच्या बाजूला सत्तेची मस्ती आहे. मी एक सामान्य माणूस आहे.
मी तत्वाकरिता लढतो. मी ध्येयाकरिता, भूमिका घेऊन लढतो. तुमच्याकडे पोलीस खातं आहे. तुमच्या केंद्रीय यंत्रणा आहेत. अशी यंत्रणा लावा की, शंभर काय एकनाथ शिंदेंना 5 जरी फोन लावले असले, तरी माझ्या राजकीय जीवनातून मुक्त होईल”, असं आव्हान जाधव यांनी फडणवीस यांनाही दिलं आहे.
दरम्यान, सध्या भास्कर जाधव हे एकनाथ शिंदे यांच्यावर रोज टीका करत आहेत. अनेक मंत्री भाजप नेते यांच्यावर ते निशाणा साधत आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव हे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत.