कोविड-१९ संदर्भात राज्यात आतापर्यंत ७२ हजार गुन्हे दाखल

Ahmednagarlive24
Published:

मुंबई, दि.२६ : राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ७२,६९८ गुन्हे दाखल झाले असून १५,४३४ व्यक्तींना अटक करण्यात आली.

तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ७४ लाख ४३ हजार ३९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती गृह विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबरवर ७८,४७४ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का असून ज्यांनी नियमांचा भंग केला अशा ६१० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०९२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ४७,७८२ वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांवर हल्ला प्रकरणे

या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १५० घटनांची नोंद झाली असून यात ४८२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने २० पोलीस अधिकारी व ८७ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्यापैकी तीन पोलीस अधिकारी व चार कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment