Success Story : अलीकडे शेतीमध्ये मोठा बदल पहावयास मिळत आहे. पारंपारिक पिकांऐवजी शेतकरी बांधवांनी आता नगदी पिकांची लागवड सुरू केली आहे. अनेक शेतकरी फुलशेतीकडे देखील वळू लागले आहेत. कष्ट कमी, खर्च कमी आणि शाश्वत उत्पन्न असं फुलशेतीच समीकरण लक्षात घेऊन राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी विविध फुलांच्या लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातही फुलशेती अलीकडे वधारली आहे.
आता शेतकरी बांधव झेंडू, गुलाब यासह मोगरा या फुलशेतीच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या मौजे वाल्हे येथील नवंयुवक शेतकरी सागर भुजबळ यांनी देखील पारंपारिक पिकांना छेद देत मोगरा या फुल पिकाची लागवड केली आहे. सागर सांगतात की, मोगरा फुल पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची एकदा लागवड केल्यानंतर तब्बल दहा वर्षे यापासून उत्पादन मिळवता येते.
या पिकातून वर्षभर टप्प्याटप्प्याने उत्पादन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सागर यांनी आपल्या दहा गुंठे शेतजमीन मोगऱ्याची लागवड केली असून यामुळे त्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. कमी पाण्यात अन कमी कष्टात या पिकातून त्यांना चांगली कमाई होत आहे. याची लागवड एकदा केली की यावर्षी उत्पादन मिळतं यामुळे या पिकासाठी दरवर्षी जमिनीची मशागत करावी लागत नाही.
परिणामी खर्च वाचतो मेहनत कमी करावी लागते शिवाय मोगऱ्याच्या फुलाला बाजारात कायमच मागणी असते. लग्नसराई मध्ये ही मागणी दुप्पट होते. जरी हंगाम नसला तरी देखील मोगरा या फुलाला मोठी मागणी बाजारात आहे. सागर यांनी मोगऱ्याचे यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले असून यापासून ते हार आणि गजरे तयार करत आहेत. फुल विक्रीपेक्षा हार आणि गजरे विक्रीने अधिक कमाई होत असल्याचे सागर यांनी नमूद केले आहे.
सागर यांनी दहा गुंठे शेत जमिनीत लावलेल्या मोगरा पिकातून आता नुकतीच तोडणी सुरु झाली आहे. यातून त्यांना दिवसाला दोन ते तीन किलो फुलं मिळत आहेत. पुढे उत्पादन वाढणार आहे. पुण्याच्या बाजारात या मोगऱ्याला अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. यामुळे त्यांना मोगरा शेतीतून चांगली कमाई होत आहे.
निश्चितच पारंपारिक पिकांच्या शेतीत शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करत असा नवीन आणि शाश्वतं उत्पन्न देणारा प्रयोग केला तर शेतकरी बांधवांना सहजरीत्या आर्थिक प्रगती साधता येणे शक्य होऊ शकतं हेच या प्रयोगातून आज सिद्ध होत आहे.