अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील नागरिकांना महत्वाचा सल्ला ! कोवीड व इन्फ्लूएंझा आजाराची लक्षणे…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा १३ मार्च, २०२३ रोजी रात्री १२:०० च्या सुमारास अहमदनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुर्देवी मृत्यू झालेला आहे.

या रुग्णाचे विविध नमुने तपासणीसाठी पाठविले असता 14 मार्च, 2023 रोजी दुपारी २:०० वाजता खाजगी प्रयोग शाळा तपासणी अहवालामध्ये विद्यार्थी कोवीड-19 व H3N2 पॉझिटिव्ह आढळुन आलेला आहे.

नागरिकांनी घाबरुन न जाता कोवीड व इन्फ्लूएंझा आजार टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास नजीकच्या दवाखान्यामध्ये जाऊन औषधोपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

कोवीड व इन्फ्लूएंझा हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. मात्र याचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, 5 वर्षाखालील बालके, वृद्ध व्यक्ती आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आहे. या आजारापासुन सुरक्षित राहण्यासाठी वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने नियमित हात धुवावेत.

नागरिकांनी मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर ठेवावे. खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमालचा वापर करावा. डोळे आणि नाकाला स्पर्श न करणे. पौष्टीक आहार घ्यावा. भरपुर पाणी प्यावे. पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. फळे व हिरव्या पाले भाज्या यांचा आहारात समावेश करावा.

कोवीड व इन्फ्लूएंझा आजार टाळण्यासाठी हस्तांदोलन करणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध घेणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे या बाबी कटाक्षाने टाळाव्यात. ज्या व्यक्तींचे कोवीड लसीकरण झालेले नाही त्यांनी आपले लसीकरण करुन घ्यावे.

रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळुन आल्यास त्यांनी नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेत औषधोपचाराकरीता जावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe