Sanjay Gaikwad : नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. नंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. असे असताना आता शिवसेनेने बावनकुळे यांनी जाहीर केलेला हा जागा वाटपाचा फॉर्म्युला धुडकावून लावला आहे.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना किती जागांवर लढणार याचा आकडाच सांगितला आहे. यामुळे आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे. याबाबत संजय गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

ते म्हणाले, कोण नेता काय घोषणा करत असेल याला काही अर्थ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत झालेला युतीचा हा विषय आहे. यामुळे इतर कोणी काय बोलायची गरज नाही.
तसेच आम्ही 130 ते 140 जागा लढवणार आहेत. आम्ही त्यापेक्षा कमी जागा लढणार नाही, असेही ते म्हणाले. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच ते म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान चुकीचे असून त्याबद्दल त्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज दिली पाहिजे.
दरम्यान, बावनकुळे यांनी आता यावरून सावरासावर केली आहे. जागावाटपाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व त्याबाबत निर्णय घेणार आहे. जी चित्रफीत दाखविली जात आहे त्यात अर्धाच भाग दाखवण्यात आला आहे, असे म्हणत त्यांनी सावरासावर केली आहे.