सर्व घटनात्मक, संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करूनच राहुल गांधी यांना दोषी ठरवण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. या निकालाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार घटनेने राहुल गांधींना दिला असताना न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करून काँग्रेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा अवमान करीत असल्याची घणाघाती टीका भाजपा आ.बबनराव पाचपुते यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
आ.पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. काँग्रेस लोकप्रतिनिधी, – नेते, पदाधिकारी, राहुल गांधी यांना दोषी ठरवणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पत्रके काढत आहेत.

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात टीका करणे , न्यायालयाच्या निर्णयाचा जाहीर निषेध करणे हा भारतरत्न हा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेचा अवमान आहे. राहुल गांधी यांना न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालय ब पुढे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे.
हा अधिकार न वापरता न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करून काँग्रेसने न्याययंत्रणेला आपण कवडीचीही किंमत देत नसल्याचे दाखवून दिले आहे. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. आपण चुकीचे बोललो नाही याची खात्री असेल तर राहुल गांधींनी वरच्या न्यायालयात जाऊन आपले निर्दोषित्व सिद्ध करावे.
इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून अभिव्यक्ती स्वातंर्त्याचा गळा घोटला होता. जयप्रकाश नारायण , अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या नेत्यांना तुरुंगात डांबणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीच्या नावाने गळा काढावा याचे आश्चर्य वाटते. कोणाचीही बिनाकारण बदनामी करण्याचा अधिकार राहुल गांधींना नाही, हेच न्यायालयाच्या निर्णयातून दिसले आहे. असेही आ.बबनराव पाचपुते यांनी म्हटले आहे.