Ahmednagar Crime News : पहाटे दुचाकीवरून मार्केटयार्डकडे निघालेल्या एका व्यावसायिकाला तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्यांच्याकडील ७० हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना सुर्यानगर भागात घडली.
या मारहाणीत व्यावसायिक किशोर दिनकर पालवे (वय ३९, रा. सुर्यानगर, अभियंता कॉलनी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, त्यांनी उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी तिघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर पालवे हे शनिवारी (दि.२५) पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या सुर्यानगर येथील घरातून मार्केटयार्डकडे दुचाकीवर निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत एक बॅग होती व त्यामध्ये ७० हजार रूपयांची रक्कम होती.
घरापासून पुढे थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्यांना तिघांनी पकडण्याचा प्रयत्न केला. किशोर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची दुचाकी अडवून त्यांना लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
या गडबडीत त्यांच्या जवळील बॅगमध्ये असलेले ७० हजार रूपयांची रोख रक्कम काढून घेत ते तिघे पळवून गेले. किशोर यांनी घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी किशोर यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास बाघ करीत आहेत.