Girish Bapat : पुण्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.
ते अनेक वर्षे सक्रिय राजकारणात होते. अनेक पदे त्यांनी भूषवली होती. भाजपच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक म्हणून बापट ओळखले जातात. पुण्यात भाजप वाढवण्यात गिरीश बापट यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच त्यांनी सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध ठेवले होते.
काही दिवसापूर्वी बापट यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली होती. अशा परिस्थितही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं होतं.
ते कायम पक्षाशी एकनिष्ठ होते. त्यांनी भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते. त्यावेळी ‘पुण्याची ताकद, गिरीश बापट’ या घोषणेने परिसर अक्षरशः दणाणून निघाला होता.
कार्यकर्त्यांमध्ये कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची त्यांची हातोटी होती. पुणे जिल्ह्यात शरद पवारांचे वर्चस्व असताना बापट यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले. आमदार, खासदार मंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषवली होती.