Ahmednagar News : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरावर राबविण्यात येणार्या उपक्रमांच्या अंमलबजावणी आणि निगराणीच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ पालकमंत्री जिल्हा आदेश व नियंत्रण’ कक्षाची अर्थात गार्डियन मिनिस्टर बॉर रूम’ची स्थापना करण्यात आली आहे.
मंत्रालयात असणाऱ्या ‘सीएम वॉर रूम’च्या धर्तीवर जिल्हास्तरावर योजनांच्या गतिमान अंमलबजावणी व निगराणीसाठी स्थापन झालेली राज्यातील हि पहिलीच ‘पालकमंत्री वॉर रुम’ ठरणार आहे. या कक्षातून योजना व दैनंदिन प्रशासकीय कामकाजच्या महत्वाच्या बाबी यावर थेट ऑनलाइन पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे.
गतिमान कामकाजासाठी प्रेरित असलेली ही वॉर रुम राज्यातील जिल्हास्तरावर राबविण्यात येणारा पहिलाच पथदर्शी प्रयोग आहे. मंत्रालयात मुंबई येथे जसा मुख्यमंत्र्याचा सीएम वॉर रूम असते, त्याच धर्तीवर अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आता पालकमंत्री वॉर रुम स्थापन झाला आहे.
त्याच मनुष्यबळात आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करत जिल्हास्तरावर विकासाच्या योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी जलद गतीने होण्यासाठी हा आदेश व नियंत्रण कक्ष उपयोगी ठरेल असा विश्वास अपर जिल्हाधिकारी सुहास मापरी यांनी व्यक्त केला आहे.
लवकरच राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कक्षाचे लोकार्पण होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सोमवारी अपर जिल्हाधिकारी मापारी यांनी या कक्षाची पाहणी करीत येथील कामकाज विषयक आढावा घेतला.
यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, भूसुधार शाखा तहसीलदार सुनीता जऱ्हाड, आयटी सेलचे समन्वयक अभियंता रविंद्र मांगुळकर, सहायक अभियंता गिरीश सुंकी, नेटवर्क अभियंता अक्षय सातपुते, अभियंता मनिषा सचदेव, मोहसीन शेख, गौण खनिज शाखेचे महसूल सहायक विधाते आदी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने लोकहितकारी असलेल्या तसेच विकासाच्या अनेक योजना प्रशासनामार्फत राबविण्यात येत असतात. या योजनांचे नियंत्रण अंमलबजावणी आणि निगराणीचे काम मुख्यतः जिल्हा प्रशासनामार्फत सुरू असते.
शासनाच्या या योजनांच्या सोबतच पालकमंत्र्यांच्या पंत्र्याच्या संकल्पनेतून जिल्हा स्तरावर विशेष नाविन्यपूर्ण बाबी अंतर्गत काही उपक्रम सुरू केले जातात. तसेच महसूल विभागीय आयुक्त, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देखील योजनांची अंमलबजावणी व प्रशासकीय कामकाजाला गतिमान करण्यासाठी निर्देश जारी करतात.
या सर्व योजना आणि उपक्रमांच्या निगराणी व अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनात नेहमी आढावा व बैठका सुरू असतात. त्यासाठी मनुष्यबळ आणि वेळ खर्च करीत हा द्रविडी प्राणायाम प्रशासनाला करावा लागतो.
आता यावर मात करण्यासाठी नगर जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या विशेष परिश्रमातून जिल्हा आदेश व नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. हेतू साध्य झाला तर हा अहमदनगरचा हा प्रशासकीय प्रयोग राज्यासाठी पथदर्शी ठरेल.