अन्यथा जिनिंगवर कडक कारवाई करा – पालकमंत्री संजय राठोड

Ahmednagarlive24
Published:

यवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच शासनाकडून हमीभाव जाहीर होत असतो. या हमीभावाने शेतमालाची खरेदी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. शेतकऱ्यांचा कापूस सध्या घरात आहे.

या कापसाची तात्काळ खरेदी केली तर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हाती पैसे येतील. त्यामुळे कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगला निर्देश देण्यात यावे. अन्यथा चालढकल करणाऱ्या जिनिंगवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

कापूस, चना व तूर खरेदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे,

कापूस पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक चक्रधर गोसावी, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक अमोल राजगुरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे, प्रभारी अग्रणी बँक व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात एकूण ५२ जिनिंग असून यापैकी २८ सीसीआय, १६ कॉटन फेडरेशन आणि उर्वरीत आठ खाजगी आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, आगामी खरीप हंगाम बघता तसेच सद्यस्थितीत असलेली अ

डचण लक्षात घेता शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे व त्यावर प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिनिंगचे जे प्रश्न केंद्र स्तरावर आहे, ते बाजुला करून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी तात्काळ कापूस खरेदी सुरू करावी.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या उद्देशाने एका जिनिंगवर २० गाड्यांची परवानगी देण्यात आली आहे. जे जिनिंग कापूस खरेदी करणार नाही, त्यांना परवाने का रद्द करू नये, अशी नोटीस द्यावी. तसेच खरेदी झालेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे, अशा सुचना त्यांनी केल्या.

चना आणि तूर खरेदीचा आढावा घेताना श्री. राठोड म्हणाले, शेतकऱ्यांकडे असलेली तूर व चना खरेदीकरिता जिल्हा मार्केटिंग अधिकारी व व्हीसीएमएफच्या अधिकाऱ्यांनी युद्धस्तरावर नियोजन करावे.

तूर आणि चना या दोन्ही शेतमालाची खरेदी ३० एप्रिलपर्यंत होणे गरजेचे होते. केवळ खरेदीचा कालावधी वाढण्याची वाट पाहू नका. जिल्ह्यातील मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या अंतर्गत असलेल्या नऊ केंद्रावर तसेच व्हीसीएमएफ अंतर्गत असलेल्या सहा अशा एकूण १६  केंद्रावर तूर व चना खरेदी झाली पाहिजे.

अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे. त्यामुळे बँकांनी कर्ज वाटपाची गती वाढवावी, असे ते म्हणाले.

आजपावेतो जिल्ह्यात ४२ कोटींचे पीक कर्जवाटप झाले आहे. पात्र शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती योजनेबाबतचा आरबीआय स्तरावर असलेला निर्णय निकाली निघाला तर शेतकऱ्यांना जवळपास ७०० कोटींचे कर्जवाटप त्वरित करता येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी कापूस खरेदी हा विषय संपला पाहिजे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

आतापर्यंत कापूस खरेदीकरिता जिल्ह्यातील ३०८७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून फेडरेशन, सीसीआय, व्यापारी आणि बाजार समित्यांकडून एकूण ४५ लक्ष ६ हजार ५७३ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

तर २८ एप्रिलपर्यंत ५३२७२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून तूर खरेदीकरिता ४९९१२ शेतकऱ्यांची आणि चना खरेदीकरीता ६५११ शेतकऱ्यांची नोंदणी केल्याचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांचे व्यवस्थापकीय संचालकांना निर्देश : जिल्ह्यात तूर आणि चना खरेदी संदर्भात असलेली ३०  एप्रिलची मुदत तात्काळ वाढवून द्यावी. तसेच तूर आणि चना साठवण करण्याकरिता बडनेरा येथे गोडावून उपलब्ध आहे.

ते जिल्ह्याकरिता उपलब्ध करून द्यावे. या दोन्ही बाबींची पुर्तता २४ तासांच्या आत करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. म्हसे आणि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक एस. हरीबाबू यांना दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment