महाविद्यालये सुरु होणार सप्टेंबरमध्ये असे असेल नियोजन

Ahmednagarlive24
Published:

देशभरात कोरोनाने घातलेल्या धुमाकुळामुळे देशातील शैक्षणिक संस्थांचे काम बंद पडले आहे. साधारण जूनच्या सुमारास सुरू होणाऱ्या विद्यापीठांतील शैक्षणिक सत्राचा प्रारंभ सप्टेंबरमध्ये होणार आहे.

आत्ताच्या सत्रातील परीक्षा शक्य झाल्यास येत्या जुलैमध्ये होतील, अशी चिन्हे आहेत. देशातील विद्यापीठांत शैक्षणिक सत्र कधी सुरू करायचे, परीक्षा कधी घ्यायच्या आदी मुद्द्यांबाबत विचार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विशेष समितीची स्थापना केली होती.

या सात सदस्यीय समितीने आपला अहवाल बुधवारी आयोगाला सादर केला. त्यानुसार आयोगाने देशभरातील विद्यापीठांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली.

ही तत्वे पूर्णतः बंधनकारक नसली आणि स्थानिक परिस्थितीस अनुसरून निर्णय घेण्याची मुभा विद्यापीठांना देण्यात आलेली असली तरी सद्यस्थिती पाहता याच तत्वांनुसार बहुतांश महत्त्वाची विद्यापीठे पावले टाकतील, अशी शक्यता आहे.

देशभरातील विद्यापीठांमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबर रोजी सुरू होईल, तर द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ते १ ऑगस्टपासून सुरू होऊ शकेल, असे आयोगाने म्हटले आहे. ज्या राज्यांत करोनावर मात करण्यात आली आहे

त्या राज्यांत जुलै महिन्यात परीक्षा घेण्यात याव्यात, एमफील, पीएचडी विद्यार्थ्यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात यावी, तसेच, संबंधितांची तोंडी परीक्षा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात यावी, असेही आयोगाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा स्काइप वा तत्सम माध्यमांद्वारे घ्याव्यात, अशी सूचनाही आयोगाने केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment