कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जगभरात लोकांना क्वारंटाइन केलं जातं आहे. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांना सोशल डिस्टन्सिंगचा (Social distancing) सल्ला देत आहे.
मात्र 700 वर्षांपूर्वीही लोकांना क्वारंटाइन केलं जात होत. सोशल डिस्टन्स पाळलं जात होतं. 1348 च्या दरम्यान प्लेग हा रोग आला होता. त्याला काळा आजारही म्हटलं जातं होत.
त्यापासून वाचण्यासाठी लोकांना क्वारंटाइन केलं जाऊ लागलं, लोकं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू लागले होते. ऑक्टोबर 1347 साली जेव्हा 12 जहाज इटलीच्या सिसली बंदरावर होत्या.
त्या जहाजातील प्रवाशांचं कुटुंब किनाऱ्याजवळ त्यांची वाट पाहत होते. मात्र खूप वेळ जहाजातून कोणी उतरलं नाही म्हणून ही लोकं जहाजात गेली तर जहाजात मृतदेहांचा खच होता, काही लोकंच जिवंत होती.
त्यांना जहाजाबाहेर आणण्यात आलं, त्यांची हालतही फारशी चांगली नव्हती. ही लोकं बरी झाली नाहीत, मात्र त्यांच्यावर उपचार करणारी लोकंही आजारी पडू लागली. या आजाराची सुरुवात चीनहून झाली, जिथं व्यापारासाठी इटलीतील जहाज गेले होते.
जहाज इटलीला पोहोचल्यानंतर मिलान आणि वेनिससारख्या शहरातून हा आजार 8 महिन्यात इटली, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्वित्झर्लंड, जर्मनी, स्कँडिनेविया आणि बॉल्टिकला पोहोचला.
पुढील 5 वर्षांत या 12 जहाजांमुळे युरोपमध्ये एक तृतीयांश लोकसंख्येचा बळी गेला. त्यावेळी शास्त्रज्ञांना व्हायरस, बॅक्टेरिया याबाबत माहिती नव्हती मात्र हा आजार माणसामाणसांमध्ये पसरतो आहे, हे समजलं. त्यानंतर या आजाराने प्रभावित झालेल्या युरोपियन देशांमध्ये सोशल डिस्टन्सिंगला सुरुवात झाली.