परराज्यात अडकलेल्या विद्यार्थी, नागरिकांना आणण्यासाठी आराखडा तयार करा

Ahmednagarlive24
Published:

नागपूर, दिनांक 30:-‘लॉकडाऊन’मुळे राज्यात व राज्याबाहेर अडकून पडलेले विद्यार्थी, मजूर व नागरिकांना परत आणण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून अशा व्यक्तींची माहिती गोळा करून निधीसह तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयातून आज त्यांनी नागपूर विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व अप्पर आयुक्त अभिजित बांगर यावेळी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापनांतर्गत वितरित करण्यात आलेला निधी, मदत छावण्या, अन्य ठिकाणी अडकलेले विद्यार्थी व मजूर व कोविड -१९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना या सर्व बाबींचा आढावा, यावेळी घेण्यात आला. देशात लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे आपल्याकडील  विद्यार्थी, मजूर व नागरिक अन्य जिल्हा व राज्यात अडकले आहेत.

त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ नियोजन करावे. अन्य ठिकाणी अडकलेल्यांची माहिती गोळा करून निधीसह प्रस्ताव सादर करावा.

पीपीई किट, मास्क, सॅनिटरायझर, वैद्यकीय सोयी सुविधा, व्हेंटिलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र व थर्मल स्कॅनर इत्यादी साधन खरेदीबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विलगीकरणासाठी तात्पुरती निवास व्यवस्था, अन्न, कपडे, वैद्यकीय देखभाल, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचारी यांची वैयक्तिक सुरक्षा साधन इत्यादींचा आढावा, श्री. वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालय व शासकीय इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यात अडकलेले मजूर तसेच पुणे, दिल्ली, विजयवाडा, मुंबईसह राज्याच्या अन्य जिल्ह्यात अडलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे अन्य राज्यातील तसेच जिल्ह्यातील आपल्याकडे अडकलेल्या विद्यार्थी व मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी तेथील प्रशासनासोबत समन्वय ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.

गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात ‘स्वॅब’ तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून ही प्रयोगशाळा लवकर सुरू करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. नागपूर येथील दिप्ती सिग्नल भागात असलेल्या ६०० कुटुंबांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कोरोना साथरोग नियंत्रण कामासाठी सेवा घेण्यात आलेल्या होमगार्डच्या वेतनाचा मुद्दा जिल्हाधिकारी नागपूर यांनी मांडला असता वेतनाचा प्रस्ताव पाठवावा मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्हाधिकारी यांना वडेट्टीवार यांनी विविध सूचना केल्या. साथरोग नियंत्रणासाठी विभागीय आयुक्तासह सर्व जिल्हाधिकारी करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment