अलिबाग, जि.रायगड, दि.1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाली असून या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पद्मश्री बैनाडे,
उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती आदी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील मोजकेच कर्मचारी उपस्थित होते.
या निमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या रायगडवासियांना शुभेच्छा दिल्या व कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण एकजुटीने बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला हा ध्वजारोहण कार्यक्रम प्रथमच अत्यंत साधेपणाने मात्र उत्साहात संपन्न झाला.