MSRTC News : एसटी प्रवासासाठी ज्येष्ठ व महिलांना मोठी सवलत दिल्याने नक्की कोणाचे होत आहेत हाल ? वाचा

Ahmednagarlive24 office
Published:
MSRTC News

MSRTC News :एसटीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास’ असे म्हटले जाते, म्हणून प्रवासासाठी एसटी बसलाच प्राधान्य दिले जाते. त्यात आता एसटी महामंडळाने महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यापासून एसटी बस नेहमी भरून जात आहे. त्यात दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या जागांवरही अन्य प्रवासी बसतात.

त्यामुळे दिव्यांगांना जागाच मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक एसटी बसमध्ये विशेष घटकांतील नागरिकांसाठी एसटी बसमधील काही सीट आरक्षित असतात.

तसे सीटच्यावर नमूदही केलेले असते परंतु आरक्षित जागेचा वापर इतर प्रवासी करत असल्याने या राखीव जागा फक्त नावालाच उरल्याचे चित्र आहे. शासनाने ज्येष्ठ व महिलांना प्रवाशांसाठी मोठी सवलत दिल्याने बस स्थानकात बसमध्ये जागा पकडण्यासाठी एकच झुंबड उडत आहे.

त्यामुळे दिव्यांगांना जागा पकडणे शक्य होत नाही. त्यांना आरक्षित जागेचा फायदा होत नाही. बसमधील मोकळ्या जागेवर ताटकळत उभा राहूनच तर कधी खाली बसून प्रवास करावा लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

एसटी बसच्या दरवाज्यावर दिव्यांग प्रवाशांना चढण्यास व उतरण्यास चालक व वाहक आणि मदत करावी, अशा सूचनादेखील आहेत. मात्र, चालक व वाहक आपल्या कामात व्यस्त असतात, त्यात आता गर्दी वाढल्याने दिव्यांगांसाठी कुणीही थांबत नाही.

त्यामुळे दिव्यांग प्रवाशांना बसमध्ये प्रवास करताना अडचणी येत आहेत. याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देण्यासह चालक व वाहकांनाही स्वतःहून दिव्यांगांची मदत करणे गरजेचे आहे. यापूर्वी एसटी बसमध्ये एवढी गर्दी नसायची त्यामुळे जागा मिळायची. परंतु, आता सर्व मार्गावरील एसटी बसेस नेहमी फुल्ल राहतात. त्यामुळे एसटीत जागा मिळण्याआधी चढण्याचीच मोठी अडचण होते. जागा न मिळाल्यास खाली बसून प्रवास करावा लागतो. याकडे वाहकाने लक्ष देणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe