Maharashtra Rain : उन्हाच्या तडाख्यानंतर आता राज्यात विविध ठिकाणी पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मिळणार आहे.
राज्यात मे महिन्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. त्यामुळे अनेक भागांत तापमानाने उच्चांक गाठला. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत होती आता मात्र मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर ते दक्षिण भागात असलेला कमी दाबाचा पट्टा आता राज्यात सक्रिय होत आहे.
त्यामुळे पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर, राज्यातील कमाल तापमान पुढील ४८ तासांत सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे पुढील चार-पाच दिवसांत राज्यातील काही भागांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होईल.
सध्या विदर्भ, मराठवाड्यामधील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या भागांमधील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र, पुढील पाच दिवसांमध्ये इथेही तापमान कमी होणार आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे येथील तापमानात घट पाहायला मिळत आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
राज्यात तुरळक भागांत पाऊस पडला असल्याचे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान, आगामी काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार आहे. तत्पूर्वी, राज्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे.
ढगाळ हवामानामुळे शहरांच्या कमाल तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान चंद्रपूर येथे ४३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे. तर, सर्वांत कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १५.९ अंश सेल्सिअस इतके होते. २८ ते ३१ मे दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे