पंढरीच्या वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज ! थेट तुमच्या गावापासून मिळणार सेवा…

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : पंढरपूर आषाढी एकादशीच्या वारीसाठी लाल परी सज्ज झाली असून राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाने तब्बल ४०० एसटी बसेसचे नियोजन केले आहे.

दि.२५ जून ते दि.३ जुलैच्या कालावधीसाठी एसटी बसेसच्या फेऱ्या नगर जिल्ह्यातून पंढरपूरसाठी होतील. नगर शहरात तारकपूर बसस्थानक येथे यात्रा केंद्र असून पंढरीसाठी मार्गस्थ झालेल्या बसेस विठ्ठल सहकारी साखर कारखान्यापर्यंत धावतील. ४५ चा ग्रुप असला तर एसटी थेट गावापर्यंत पोहोचेल.

वारी सुखाची आणि प्रवास सुरक्षित होण्यासाठी हे नियोजन केले असल्याची माहिती अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली. प्रति वर्षाप्रमाणे आषाढी वारी पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामडळाच्या अहमदनगर विभागाने केलेल्या नियोजनाची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयात शनिवार दि.२४ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत विभाग नियंत्रक सपकाळ यांनी दिली.

यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अनिल भिसे, विभागीय वाहतूक अधिक्षक अविनाश कल्हापुरे आदी उपस्थित होते. विभाग नियंत्रक सपकाळ म्हणाल्या, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पंढरपूर यात्रेसाठी वारकर्‍यांची वाढती संख्या निदर्शनाला येत आहे.

हे लक्षात घेऊन वारकरी प्रवाशांची वारीदरम्यान गैरसोय होऊ नये यासाठी अहमदनगर विभागाने आषाढी यात्रा कालावधी दरम्यान एसटी बसेसचे नियोजन केले आहे. नगर जिल्ह्यातील अकरा आगारातून २३५ बसेस यात्रेसाठी फेऱ्या करणार आहेत.

यासोबतच धुळे आणि जळगाव या विभागाच्या प्रत्येकी ७५ प्रमाणे दीडशे बसेस नगर जिल्हासाठी तैनात ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुख हे त्यांच्या आगार केंद्राचे यात्रा प्रमुख म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहेत.

त्यांच्या मदतीस संबंधित स्थानक प्रमुख राहणार आहेत. नगर जिल्हातून नगर विभागाच्या पंढरपूरसाठी जाणार्‍या एसटी बसेस पंढरपूर परिसरातील विठ्ठल कारखाना यात्रा केंद्रावर शेड क्रमांक तीन येथे जातील. माहीजळगाव येथे बसेसचे बिघाड दुरुस्ती पथक तैनात राहील.

यात्रा कालावधीसाठी साधी, शिवशाही, शयनयान एसटी बसेस धावणार आहेत. सर्व प्रकारच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवास करताना प्रवास दरात महिलांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच ७५ वर्षावरील महिला आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी दरामध्ये शंभर टक्के सवलत मिळणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाची एसटी प्रवासाचे सुरक्षित आणि विश्‍वसनीय साधन आहे. वारी करीत असताना सर्व प्रवासी नागरिक आणि वारकरी बांधवांनी एसटीनेच पंढरपूर यात्रा करावी. सुर्रक्षत आणि सुखकर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस सेवेचा लाभ घ्यावा. खाजगी वाहनाने प्रवास करू नये, असे आवाहन डीसी सपकाळ यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe