पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल ! पाऊस पडण्यासाठी पांडुरंगाला साकडं

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव, आव्हाणे, परिसरातील शेती मशागतीची कामे झाली असून, यावर्षी पावसाचे आर्द्रा आणि मृग नक्षत्र कोरडे चालल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत,

विठुरायाच्या दर्शनाचीही ओढ लागल्याने शेतीची कामे उरकावी म्हणून लवकर पाऊस पडण्यासाठी पांडुरंगाला वारकऱ्यांनी साकडं घातलं आहे. मागील वर्षी २८ मे रोजी झालेल्या पावसावरच १५ जून दरम्यान कपाशीच्या लागवडी पूर्ण झाल्या होत्या तर बाजरी व सोयाबीन पेरण्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात झाल्या होत्या.

एकंदरीत जून अखेर खरीप पेरणीची कामे आटोपून बहुतांशी वारकरी हे पांडुरंगाच्या भेटीसाठी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. यावर्षी मात्र चित्र वेगळंच निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण दाटू लागले आहे. त्यातच अद्यापही उष्णतेची तीव्रता कमी झालेली नाही.

दरवर्षीपेक्षा यंदा उष्णतेतील आर्द्रतेचे प्रमाण कमाल दिसून आले. एवढे ऊन व उष्णता कधीच जाणवली नसल्याचे जुने जाणते सांगतात. त्यातच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भयंकर चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने पावसाबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.

जर पाऊस लांबला तर शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यावर्षी रोहिणी, आर्द्रा व आता मृगही कोरडा जात असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. एकीकडे पावसाची ओढ तर दुसरीकडं पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागल्याने शेतकरी, वारकऱ्यांची मात्र द्विधा अवस्था झाली आहे. पंढरीच्या दिशेने चालताना मन मात्र काळ्या आईच्या कुशीत तर डोळे आभाळाकडे लागले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe