अगोदर मागचे काम पूर्ण कर, त्यानंतर पुढचे काम कर, असे म्हणाल्याचा राग आल्याने जेसीबी चालकाने ग्रामपंचायत सदस्याला लोखंडी टामीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे दिनांक २१ जून २०२३ रोजी घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की मोहन रंगनाथ खळेकर (वय ४५ वर्षे, रा. वांबोरी, ता. राहुरी) हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या वार्ड नं. एकमध्ये शासनाची जलजिवन पाणी योजना चालु असून त्याचे काम भगवान गोवर्धन कल्हापुरे यांच्या मालकीच्या जे.सी.बी.च्या साह्याने चालु आहे.
दि. २१ जून २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मोहन खळेकर तसेच बाबा पवार व काका पवार हे त्यांच्या वस्तीजवळ चालु असलेले जलजिवन योजनेच्या पाईपलाईनचे काम बघण्यासाठी गेले होते.
तेव्हा ते आरोपी भगवान गोवर्धन कल्हापुरे यास म्हणाले, की तू मागचे काम अगोदर पूर्ण कर. त्यानंतर पूढचे काम कर. याचा आरोपीला राग आल्याने त्याने मोहन खळेकर यांना शिवीगाळ करून तू ग्रामपंचायत सदस्य तुझ्या घरचा मला काय करायचे, असे म्हणुन त्याने लोखंडी टामीने मारहाण करून गंभीर जखमी केले.
त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहन रंगनाथ खळेकर यांनी रूग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांसमक्ष जबाब नोंदवीला.
त्यानुसार आरोपी भगवान गोवर्धन कल्हापुरे (रा. खंडाबे खुर्द, ता. राहुरी) याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ६८२ / २०२३ नुसार भा. दं.वि. कलम ३२६, ५०४, ५०६ प्रमाणे जबर मारहाण व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.