Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी पावसाचा जोर वाढला !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : मुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. या मोसमात सुरुवातीलाच रतनवाडी आणि घाटघर येथे साडेचार इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली.

दरम्यान अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील आंबित येथील लघु पाटबंधारे तलाव बुधवार (दि.२८) दुपारी २:०० वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी रात्री पासून पावसाचा जोर वाढला.

मंगळवारी सायंकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहापर्यंतच्या बारा तासांत भंडारदरा येथे तब्बल ६७ मिमी पाऊस पडला. एकूणच पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, पांजरे येथेही रात्रभर पावसाचा जोर वाढला आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा ओल्याचिंब झाल्या आहेत.

बरसत असलेल्या पावसाच्या सरींमुळे या परिसरातील ओढे-नाले वाहू लागले आणि भात खाचरेही भरून वाहू लागले आहेत. यामुळे भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वाढू लागली आहे. धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत नाही.

अकोले तालुक्यात दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसत आहेत. बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत पाणलोट क्षेत्रात नोंदला गेलेला पाऊस मिमी मध्ये पुढीप्रमाणे:- रतनवाडी ११९, घाटघर ११६, पांजरे १०१, भंडारदरा ८९ तर वाकी येथे ६९ मिमी पावसाची नोंद झाली.

बुधवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५ हजार २३६ दलघफ इतका झाला होता. सह्याद्रीच्या पर्वत रांगांतील हरिश्चंद्र गडाच्या परिसरात मागील चार दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे या परिसरातील ओढे-नालेही भरून वाहू लागले आहेत.

हरिश्चंद्रगडाच्या पर्वत रांगांतील कुमशेतच्या आजोबा पर्वतात उगम पावणाऱ्या मुळा नदीचा प्रवाह आंबित गावाच्या वरील लघु पाटबंधारे तलाव बांधत अडविण्यात आला. तालुक्यात मुळा खोर्यात लघु पाटबंधारे तलावांची श्रृंखला बांधण्यात आली आहे.

असे असले तरी आजपर्यंत अकोले तालुक्यातील १९३ दलघफू क्षमतेचा आंबित येथील लघु पाटबंधारे तलाव सुरुवातीला भरुन वाहू लागतो. याप्रमाणे यावर्षीही आंबित येथील लघु पाटबंधारे तलाव बुधवारी दुपारी दोन वाजता ओसंडून वाहू लागला. यामुळे मुळा नदी प्रवाही झाली असून आता पिंपळगाव खांडच्या धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होणार आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe