बनावट रंग तयार करून एशियन कंपनीच्या नावाने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अहमदनगर शहरातील टिळक रोडवरील पेंटस कॉर्नरचा मालक हितेश कांतीलाल पटेल (33, रा. समर्थनगर, बुरुडगाव) यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २ लाख ७४ हजार रुपये किमतीचा बनावट रंग हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी ही कारवाई केली.
एशियन कंपनीच्या नावाने बनावट पेंटची अहमदनगर शहरात विक्री केली जात आहे, अशी माहिती कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयास प्राप्त झाली होती.
कंपनीचे प्रतिनिधी आनंद राधेशाम प्रसाद हे यांच्यासह मुख्य तपासी अधिकारी सुभाष हरिचंद्र जैयस्वाल हे शुक्रवारी अहमदनगर येथे आले होते. त्यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टिळक रोडवरील पेंटस कॉर्नर, या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी तिथे एशियन कंपनीचे स्टीकर्स, प्लास्टिकच्या बकेट आढळून आल्या.
सदरचा रंग बनावट असल्याचे आढळून आल्याने आरोपी ताब्यात घेऊन २ लाख ७४ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलिस नाईक गणेश भिंगारदे, अमृत आढाव आदींच्या पथकाने केली.